Friday, January 8, 2016

प्रदान मधला मी


ट्रेनिंग संपल्यानंतर माझ्या कामाची सुरुवात केसिया गावातून झाली. दुसर्या-तिसर्या भेटीत मी झुनकी बाईच्या घरी मलबरी प्लांटेशन चा आढावा घेण्यासाठी गेलो होतो. काही कारणास्तव ती चिडून कुणाशी तरी भांडत होती. मी तिला प्लांटेशन विषयी विचारता ती लाकडाचा फाटा घेउन मला मारायला धावली. तिच्या एकुणच हालचाली वरुन मला कळल की ती महुआ ची दारु ज्याम प्यायली होती. मी माझी बाइक तशीच धडपडत वळवली आणि धूम ठोकून पलालो. मी ज्या लोकांसाठी सगळ सोडून इकडे आलो ते अशी माझ्या मागे लाकडाची फाटी घेउन धावणार आणि मी असा जीव मुठीत धरून पळणार - व्वा! पाच वर्षानंतर हीच झुनकी बाई माझ्यासाठी नवरी मुलगी शोधायला गावं पालथी घालत होती. “भैया, 30 साल तक हमारे यहाँ 4 बच्चे हो जाते है, तेरी तो अभी तक शादी भी नहीं हुई. मैं तेरे लिए दुल्हन देखती हूँ, बता तेरा गोत्र क्या है?” काही दिवसानंतर झुनकी बाई भेटली, “भैया तेरे गोत्र की लड़की मिली है – नववी पास है, गोरी है, अच्छा खाना बनाती है, उसका बाप ढोल बजाता है, वह तेरे साथ बम्बई जाने के लिए भी तैयार है – बस इससे ज्यादा और क्या चाहिए होता है? कब देखने आ रहा है तु उसे? तेरे माँ-बाप को भी बुला ले.” हे बोलताना तिचे डोळे नेहमीप्रमाणे भरून आले. कुणी शिव्या घालाव्यात तर झुनकी बाई सारख्या आणि कुणी प्रेम कराव तर तिच्या सारख असच मला नेहमी वाटत राहिलय - रांगड़ आणि सरळ, काहीही हातच्च न ठेवता. आयुष्यात झुनकी बाई भेटली नुसत्या ह्यासाठीचं गेली दहा वर्ष न्यौछावर आहेत. झुनकी बाई दूसरी-तिसरी शिकली असेल कदाचित, तिला फक्त तुटकी सही करता येते, राजू तिचा नवरा – तो तिला कधीच समजला नाही ह्या नाजुकशा जाणीवेने ती त्याची साथ देत आलीये तितक्याच प्रेमाने, चालिशी पार झाली आहे, चार मुलांची आई, तिला नातवंड पण झाला असतील आता, गोंड या आदिवासी समाजातील मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्य्हातील शाहपुर तहसील मधील केसिया गावची.. तरल माणुसकी आणि सजग नेतृत्व क्षमता ह्यांच बेमालूम कॉम्बिनेशन असलेली मी अजुन दुसरी व्यक्ति पाहिली नाही.  



मी प्रदान मधे गेले दहा वर्ष कार्यरत आहे. प्रदान – प्रोफेशनल असिस्टेंस फॉर डेवलपमेंट एक्शन च एक्रोनिम आहे. स्वातंत्र्यानंतर बरेचसे ‘गाँधीवादी’ राज् कारणात ना जाता समाजकारणात गेले. त्यानी छोट्या ठिकाणी आपल्या संस्था सुरु केल्या. विदर्भात आजही अशा संस्था आहेत. ते खादी वापरत, बरेचसे ब्रह्मचर्य पाळत, आणि साधी राहणी ठेवत. ह्या संस्था लोकांनी दिलेल्या दानावर्ती चालत. कालांतराने एकोनिशसे साठच्या शेवटी कॉलेज मधून बाहेर पडणारे आदर्शवादी तरुण गावात जावुन आपले प्रोफेशनल, टेक्निकल स्किल्स गावकार्यासाठी वापरू लागले. गाँधीवादी संस्था ज्या फक्त आदर्शवाद अणि केवल समाज् सेवेच्या इच्छेने प्रेरित होत्या तर ह्या संस्था सत्तरिमधे प्रोफेशनल होवू लागल्या होत्या. अशाच डॉ. रबाले दाम्पत्याला अहमदनगर मधे गरीब पेशेंट्स ची जमिनीवर बसून सुश्रुषा करत असताना जेव्हा दीप जोशी नी पाहिल, तेव्हा त्यांना वाटलं की जोपर्यंत प्रोफेशनल्स गावात येउन, ग्रास्ररूट मधे राहून काम करत नाहीत तोपर्यंत शाश्वत (सस्टेनेबल) बदल होणार नाही. ह्याच प्रेरनेने  गावातून जन्म घेउन मैकेनिकल इंजीनियरिंग नंतर अमेरिकेत MBA केल्यानंतर, देशासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरनेने भारावलेल्या दीप जोशींनी आपल्या इतर सहकार्यासोबत प्रदान ची स्थापना १९८३ मधे केली. कमित कमी १६ वर्षे प्रोफेशनल डिग्री घेतलेले युवक/युवती जे “हेड एंड हार्ट” दोघांचा वापर करुन समाजातल्या शोषित आणि वंचित लोकांसाठी काहीतरी करू इच्छितात ते प्रदान मधे येवू शकतात.



माझा शालेय शिक्षण रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यात झालं. शाळेत असताना फक्त अभ्यासच केला. आपण जसे 80 टक्के (तेव्हा ते बरेच होते!) आणि पहिला (कमीत कमी पहिल्या तीनात) यायच्या शर्यतीत मीही सलग दहा वर्ष भाग घेतला होता अणि त्यात कमी-जास्त यशस्वी ही ठरलो होतो. शालेत प्रत्येक वर्षी पहिले आलेल्यांची नाव एक बोर्डवरती लिहिल जायची अणि त्यांची इतकी गुणगाण व्हायची की त्यांची भूतं शालेतच वावरायची जणू. ते पहिल येण्यासाठी काय ‘त्याग’ करावा लागायचा हे मला चांगलच ठाउक होता. अशा जबर मेह्नतितुन पहिले आलेले काय करत आहेत ह्याचा मी जेव्हा शोध घ्यायचो तेव्हा ते सगल्यासारखेच सकाळची पहिली बस पकडायचे, तशाच स्वरुपाची कामं करायचे जे मज्जा मारुन पास झालेले करायचे – थोडक्यात सगलेच मजदूर (proletariat)! ह्या गर्दीत मी कुठे असा प्रश्न मला नेहमीच पडायचा. गणितात चांगला आणि मुलगा म्हणून इंजीनियरिंग, अणि केमिस्ट्री फिजिक्स पेक्षा जास्त आवडत म्हणून केमिकल इंजीनियरिंग अशा मध्यम-वर्गीय ढोबल सुत्राने मी केमिकल इंजीनियरिंग संपवल – ते आवडलही.  पण त्याचं अणि माझ काय गणित बसतय हे उमगत नव्हत. सगले पीएचडी करायला अमेरिकेची, किव्वा MBA करायला IIMs ला जायची तयारी करत होते. माझा परत तोच दहाविचा प्रश्न त्याच्यानंतर पुढे काय? माझा एक प्रोब्लेम आहे – मला जोपर्यंत जे करायचा आहे त्यापद्दल पोटात गुदगुल्या होत नहीं तोपर्यंत कही करता येत नाहीत.  सामान्यतः कन्फ्यूज्ड engineers जॉब करायचा पर्याय निवडतात – जो मी केला. मी दोन वर्ष एका लुब्रिकेंट प्रोडक्शन कंपनी मधे काम केल. कंपनी मधे इंजीनियरिंग च्या उन्गल्या करण्याबरोबर आमच्या यूनिट च्या केमिस्ट आणि वर्कर सोबत गमती केल्या. ते सगले माझ्या वडिलांच्या वयाचे होते, पण मस्त होते.. आजही आम्ही भेटतो, बोलतो, आमचा whatsapp ग्रुप आहे. एकदा आम्ही सगळे ट्रैकिंग ला गेलो तेव्हा, आमच्या HR जनरल मेनेजर ने मला फरमान सोडला की ऑफिसर्स नी असं वर्कर्स सोबत मिळून-मिसलून राहू नये. मी म्हटल तुम्ही आमच्या यूनिटच काम बघा, ते कस करायच ही माझी जबाबदारी. तेव्हा मला कळत चालल होत की मला ही लोकांचातली केमिकल रिएक्शन भावते. लोकांच्यातचं राहून काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होता.. मग काय MBA – HR करायचं? मध्यमवर्गियंचं दुसरं करियर-आप्शन IAS होण असत.. घरून तस म्हनायचे.. ते कराव का? पण मग इंजीनियरिंग पण आवडायचं.. त्यादरम्यान काही पुस्तक वाचनात आली. गुरचरण दास यांच ‘India Unbound’ वाचल्यानंतर beuraucracy ला करियर कराव वाटतं नव्हतं. आणि मला खुर्चीत बसून कामं नव्हत करायचं – स्वतः काहीतरी क्रिएटिव कराव वाटत होतं. त्याच् वेळेला साधनाताई आमटे यांचं ‘समिधा’ वाचलं आणि ठरलं की गावात जावुन cooperative बायोडिजेल प्लांट टाकायचा! कंपनी मधे दोन वर्षात शाळेत आणि कॉलेजात एव्हढ्या मेहनतीने जे शिकलं होतं त्यापेक्षा स्वतःला जास्त अप्लाई केल होतं अणि तेचं जास्त आवडल होतं. मग हा प्रश्न पडला की हे असचं आवडत तर मग शिकुन उगाचं तरुणाइची वर्षं कशाला वाया घालवायची (जशी घालवली होती तशी!) आपल्या ‘रट्टा’ मारून शिकायच्या पद्धतीच्या पण राग मनात वाढत गेला होता. आणि सर्वात insensitive म्हणजे त्या परिक्षा आणि रिजल्ट म्हणजे तर ह्या सर्वांचा कळस! आता मी मला हवा ते शिकत होतो, त्याचा सिलेबस मीच ठरवत होतो, त्याच्या परिक्षा अक्षरशः खर्या-खुर्या द्वाया लागायच्या, त्याच्या  उत्तरपत्रिका स्वतःलाच तपासायला लागत, रिजल्ट मधे आपणच पहिले आणि शेवटचे!

अशे बरेच आपल्याला दिसतात (त्यात महाराष्ट्रियन जास्त!) की ज्यांचासाठी ‘समाजसेवा’ म्हणजे अनाथ मुलांना खाऊ वाटने, वृद्धाश्रमाला वाढदिवसाच्या दिवशी चादर वाटने, किव्वा कधीतरी वीकेंड ला झोपड़पट्टीत मुलांचे टूशंस घेण इथपर्यंत. हेही गरजेचच- पण त्याचा नको तितका गवगवा. अगदी जास्तच झालं तर ठाण्याच्या आदिवासी पाद्यात किव खुपच झालं तर विदर्भ. पण काहीही झालं तरी महाराष्ट्राच्या बाहेर नाही! (ह्याला अपवाद फक्त अमेरिका) संध्याकाली आईच्या किव्वा बायकोच्या हातची मच्छी किव्वा कारल्याची भाजी मिलाली पाहिजे जणू. ह्याला कित्त्येक अपवाद्, पण ही ‘जनरल टेडन्सी’ आहे हे नक्कीच. कुठल्यातरी अत्त्युच्च ध्येयापोटी सर्वोच्च पणाला लावण ते बाजुच्या घरातल्यान्नी – आपण बस 10.30 ते 5.30! हे अगोदर फक्त वाटत होतं, इतक्या वर्षानंतर हे माझा ठाम मत झालय. ह्या सगल्याच्या बंड म्हणजे कुठेतरी बाहेर पड़ण.

मी जॉब करतानाच वेगवेगळ्या CSOs(Civil Society Organisations) मधे संपर्क साधत होतो. माझा बायोडाटा पाठवत होतोत. पण त्यांना सोशल वर्क किव्वा रूरल मैनेजमेंट डिग्री असलेले लोक हवे होते आणि मला अजुन शिकायचा नव्हत! ना राहवून मी Institute of Rural Management, Anand (IRMA) ला भेट दिली – तिकडे जायचा का हे बघायला. तिथले काहीजण तेव्हा प्रदान ला चयनित झाले होते. त्यांनी मला प्रदान ला अप्लाई करायला सांगितलं – जिथे फक्त इंजीनियरिंग डिग्री असलेले माझ्यासारखे लोकही अप्लाई करू शकत होते. माझ्या इंटरव्यू च्या वेलेलाच मी आकृष्ठ झालो – इंटरव्यू घेणारे फार हसतमुख होते, त्यांचा बोलण्यात आपुलकी होती, ते ‘माझ्यात’ रूचि घेणारे वाटले. (असा मला कधी इंजीनियरिंग जॉब च्या इंटरव्यू ला वाटलं नव्हत!) 

मध्य प्रदेश मधे होशंगाबाद जिल्ह्यामधे केसला तहसील आहे. तिथे मी 16 मे 2005 ला रुजू झालो. जरी मी दोन वर्ष जॉब केला असला तरी इथे मी Development Apprentice (DA) म्हणून ज्वाइन केलं कारण मला ह्या कामाविषयी काहीही माहित नव्हतं! त्यावेळी मला वाटायचा हे जमेल का मला? मी इकडे येवून चुक तर नाहीं करत आहे ना? हे आपल्याला जमलं नाही तर? पण वयाच्या बाविसाव्या वर्षी काहीतरी शुन्यातुन सुरु करायचं एक थ्रिल पण वाटत होतं. ह्या एक वर्षात मला शिकण्या व्यतिरिक्त काहीही करायचा नव्हतं. प्रदान ची Development Apprenticeship (DAship) डेवलपमेंट सेक्टर मधे आदर्श मानली जाते – जिथे सोशल वर्क ची कुठली डिग्री नसलेले युवक ही कॉलेज मधून रिक्रूट केले जातात आणि ते पुढे जावुन ह्याची करियर म्हणून निवड करतात! मुख्यतः DAship साठीच प्रदान चे संस्थापक दीप जोशी ह्यांना 2009 चा एशिया खंडाचा नोबेल मानल जाणारा रेमन मेगसेसे आणि भारत सरकार चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक DA चा एक फील्ड गाइड असतो – जो प्रदान मधे 5 वर्षाहुन जास्त कार्यरत असतो. ह्या एक वर्षा मधे भारतातल्या उत्कृष्ठ मानसशास्त्रद्न्य सोबत DA एक-एक आठवडा (WEEK) असे तीन सेशन असतात – ज्यातून तुम्हाला हा निर्णय घ्यायला मदत होते की  हे क्षेत्र तुमच्या साठी आहे का? जर हे नहीं तर कुठलं क्षेत्र माझ्यासाठी योग्य आहे. अशीही उदाहरण आहेत की ह्या सेशन नंतर कित्येक जणांना वाटलं आहे की मला फिल्म-मेकर, रिसर्चर किव्वा माझ्या कोर फील्ड (इंजीनियरिंग, अग्रिकल्चर) कडे जायचं आहे! हे सगळ कलल्यावर वाटलं जगात असं कुठली कंपनी/संस्था आहे जी त्यांच्या कर्मचार्यान्ना कंपनी च्या खर्चाने त्यांचं व्यवसायिक क्षेत्र शोधायला मदत करते? ह्यामागची प्रदान ची भूमिका अशी आहे की, जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा मला काय करायचं आहे हा विचार करायला वेळ मिळाला नसतो.. एक rat-race मधे आपण सगले पळत असतो. अशा वेळेला जेव्हा एक युवक/युवती ग्रेजुएट होवुन प्रदान मधे येते तेव्हा तिला अश्या मानसशास्त्र द्न्यानी डिजाईन केलेल्या प्रोसस्सेस मधून जावुन आपलं क्षेत्र निवडायला मदत करण. अशा छोट्या-छोट्या गोष्टी ज्यामधे तुमच्यातला माणसाला, तुमच्या individulity ला महत्त्व दिला जात होतं – हे मला आवडतं होतं. बर्यचशा कंपनी मधे, CSO मधे संस्थापक आजन्म निदेशक (Director) राह्तात. पण प्रदान मधे संस्थापक वयाच्या 60 व्या वर्षी सेवा-निवृत्त झालेत. एक निदेशकाचा कार्यकाल फक्त 5 वर्षा असतो जो वाढवता येत नाही. प्रदान मधे कुणीही कर्मचारी नाही. आम्ही सगळेच प्रदान आहोत. एक वर्ष झालेला व्यक्ति आणि निदेशक दोघांची equity प्रदान मधे तेव्हढीच आहे.

सुरुवातीचा एक आठवडा मी माझ्या सीनियर लोकासोबत गावात गेलो. ते पण माझ्यासारखेच वेगवेगळ्या शहरातून येवून आवडीने काम करत होते. ते सगले भारतातल्या वेगवेगळ्या नामवंत  कॉलेज मधून शिकलेले युवक/युवती होते. त्यांना अस काम करताना पाहून मला छान वाटतं होत – आपण असे एकटेच वेड्यासारखे आलो नाहीत- अजुन बरेच वेडे आहेत इथे! दोन आठवद्यानंतर माझा “Village Stay” सुरु झाला. हा प्रदान मधील DAship चा एक महत्वचा भाग आहे. एक reality-check – असं काम करायचा तर गावात राहण आलं – मग ते मला जमेल का ह्याची प्रत्यक्ष चाचणी! मला खोहरा ह्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कोरकू आदिवाशी पाद्यात राहायच होत. तेव्हा वाटलं होतं मला बाहेरून वाटत होता तेव्हढ सोशल वर्क रोमांटिक नाहीये! मला असं वाटतं होतं की जणू मी कुठे ट्रैकिंग ला आलोय – समोर डोंगर, मुसलधार पाऊस, जंगलात चरायला जाणारी गुरं- ढोर अणि नज़र जाईल तीथपर्यंत शेतीची जमीन! प्रातःविधिला जंगलात आणि विहिरीवर सगल्या मुलाबरोबर अंघोलीला. सुरुवातीला मला कळच ना की मी काय कराव? नेहमीच काहीतरी असाइनमेंट/होमवर्क असलाच की अभ्यास करायची सवय लागलेली असते आपल्याला त्यामुले असा मोकाट स्वातंत्र्य मिळाल की त्याच काय कराव हे समजत नहीं आपल्याला एकदम. मी उगाच घरी बसून रहायचो, पण बाहेर जावुन लोकांशी काय बोलाव जे समजत नव्हत. शेवटी गावत एक लग्नात मला काही मुलांनी बोलवल. तिकडे जावुन आम्ही खुप्प धम्माल केली – पुर्या बनवल्या, आदिवासी नाच चिटकोर नाचलो अणि मग माझी गाववाल्यांशी गट्टी जमायाली लागली. मी त्यांचासोबत जंगलात जायचो, गुर चरायला जायचो अणि आम्ही दोघही एकमेकांना खुप्प प्रश्न विचारायचो. मला जस त्यांचा जीवनशैलिपद्दल कुतूहल होतं तसाही त्यांनाही शहरापद्दल होतं. मुंबई म्हटल्यावर तर अजुनच! – खासकरून फिल्म्स शूट कशा होतात, गाणी/रोमांटिक सीन्स कसे शूट होतात!

गावात एक कुटुम्बाचे लोक आस-पास राहतात. मदतीला एकमेकान्ना कामाला येतात. शेतीची कामं सामंजस्याने विभागून घेतात. सामाजिक कार्य मिळून करतात. असं नाही की सगला आलबेल चालतं. काही वाद झाले तर गावातले बुज़ुर्ग लोक त्याचा गावातच न्याय-निवाडा करतात. एक सोह्ला तर मी असा पाहीला की एक जोडप जे 15 वर्षापूर्वी पालूं जावुन लग्न केला होतं ते आत्ता चार मूल झाल्यावर गावाला जेवण देणार होते अणि त्यांच लग्न होणार होतं. काम अणि सण ह्यांचा वर्षाच्या बारा महिन्यात अस मिश्रण होत की काम आणि समारंभ, नाच, गाणी एकापाठोपाठ होतं. ह्या सगळ्याची मी आपल्या शहराच्या रहणिमाना बरोबर तुलना करत होतो. आपण हे काहीच करत नाही. शेजारचा मेला तरी इकडे कळत नाही. कुणी कुणाचं ऐकत नाही – सगळे आपल्या मनाचाच करतात. मला तर वाटलं आपण ह्यांना काय शिकवावं – ह्यांचाकडून आपल्याला शिकान्यसरखा भरपूर आहे. आपले पूर्वज कधी असे जगत असतील ते अपन पार विसरून गेलोय. ही नविन शहरी संस्कृति आपल्याला खरच काय देत आहे की थोडा देताना बराच कही घेउन गेलिये.. असे बरेच विचार त्यावेलेला मनात येत होते. अशाच एक दिवशी मंगत भैया ला मी विचारत होतो की त्याच्या चार मुलांना तो व्यवस्थित शाळेत पाठवत नव्हता. मी त्याला कित्येक दिवस लेक्चर देत राहिलो की शिक्षणाचे काय फायदे होतात. मी शिकून कसा आपल्या पायावर उभा आहे इ. इ. ते माझा बोलन बीडी पीत ऐकायचे पण कही बोलायाचे नाही. एके दिवशी न राहवून मंगत भैया बोलले “ भैया यहाँ दो वक़्त का ठिकसे खाने को नहीं मिलता है. खेत से साल भर का खाने के लिए नहीं पकता है. पोटली बांधके काम करने बच्चो को लेकर जाना पड़ता है. पहले पेट की दिक्कत हल हो जाये फिर पढ़ाई के बारे में सोचते है!!” मला हा प्रसंग आजही जस्साच्चा-तस्सा आठवतो जस की माझ्या मेंदुवर्ती कोरला गेलाय. ह्या प्रसंगानी मला माणसाच्या मुलभुत गरजा ज्याला आपण अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो त्यांची पुर्तता होने किती गरजेचे आहे हे कलल. जर पोटाच भरलेले नसेल तर कुणीही अजुन शिक्षण, स्वास्थ्य किव्वा पोषक आहाराविशई विचार करणार नाही. प्रदान चा काम पण अशा मुलभुत गरजा ज्यांना आजीविका (Livelihoods) म्हटल जात त्यावरती होता – ते का हे मला ह्या प्रसंगावारून कलल. आपण गावकर्यान्ना अनाडी समजुन केवल उपदेश देवून चालणार नाही – त्याचा लोक पालन करणार नाही. जस की बर्याचशा सरकारी योजनांच होता कारन त्या कही ‘उच्चशिक्षित’ लोकांनी दिल्ली/मुंबईत बसून बनवलेल्या असतात. त्यासाठी लोकांच्यात राहून त्यांची संपूर्ण जीवनशैली समजावून घेउन, त्यांचा सल्ला घेउन मिळून बनवल्या पाहिजेत. त्यासाठी माझ्यासारखया अपरेंटिस ने पाहिले त्यांची जीवनशैली समजली पाहिजे हे उमजल. 3 आठवद्याच्या village stay नंतर माझा हा विश्वास दृढ़ झाला होता की मला हे काम पुढे करायला आवडेल. मी मधून माझ्या ऑफिस मधे येवून. माझ्या फील्ड गाइड सोबत माझे अनुभव कथन करायचो. माझ्या टीम मधे प्रेजेंटेशन करायचो. एक नविन कार्यकर्त्याला त्यांचाकडून मिलनार मार्गदर्शन – हा प्रदान चा फार unique experience आहे. पण हे सगल वाचायला जेव्हढ फिल्मी वाटतय तेव्हाधा नव्हत. कित्येकदा मी निराश होत असे. माझे वर्गमित्र जे अमेरिकेत डॉक्टरेट करत होते, काही वेगवेगळ्या शहरात जॉब करत होते, त्यांचे लग्नाचे प्लान्स बनत होते, त्यांनी ठाण्यात/नवी मुंबई मधे फ्लैट्स बुक केले होते. घरून माझ्या आई-वडिलांनाही वाटत होता की हे आदर्शवादच भुत उतरून हा लवकरच परत येइल. पण मी जेव्हा माझ्या कामात स्थिर होत होतो तेव्हा ते ही अस्वस्थ्य होत होते. त्यांनाही वाटायचे की ह्याचे बाकि वर्गमित्र छान सेटल होत आहेत मग ह्यानिच का तो हा त्याग करावा. त्यांचाही त्यांचा हुशार मुलाकडून काहीतरी ‘अत्त्युच्च’ करण्याच्या अपेक्षा होत्या. आमचे फॅमिली डॉक्टर म्हणत की हे NGO वाले ह्या तरुणांना वापरतात आणि त्यांना राबवून स्वतःचा उदोउदो करूँ घेतात. हे सगले आपापल्या परीने योग्य होते. कारन त्यांनी तसच जग पाहिल होत. कुना ‘नार्मल’ मुलाला असही आपल करियर म्हणून निवडता येण योग्य आहे अशी उदाहरण त्यांनी पहिली नव्हती. मी माझ्या आई-वडिलांना लहानपनापासून घरकाम करणार्य काकुन्ना मदत करताना पाहिल. त्यांना ही एक मानुस म्हणून सन्मानाने वागावताना पहिला. माझे बाबा, श्री मनोहर जामकर  ओलाखिच्या गरीब मुलाना स्कालरशिप मिलवन्यासाथी खुप्प कष्ट घेत, तरुण मुलांसाठी नोकरी मिलावान्यसथी धडपड करत. माझी आई, सौ. अलका जामकर ही नगरपालिका शालेतली एक उत्तम शिक्षिका. सहाजिकच तिच्या शाळेत शिकणारी गरीब मूल असत. ती म्हणायची ही पोर काय डॉक्टर-इंजिनियर होणार नाहीत – त्यांना ते परवडणार नहीं. पण त्यांनी चांगले नागरिक व्हाव आणि प्रामाणिक पने आपल आयुष्य जगाव हाच माझा प्रयत्न आहे. ती  सगल्यान्ना अगदी आई सारखाच वगावायाची. त्यांचा चेहर्यावरुण हाथ फिरवून शिकवताना मी तिला पहिला आहे. मी त्यांना विचारायचो की अशा वातावरणात वाढ़नारा मी अजुन कसा वेगला होंनर तुम्हीच सांगा – हे सगला तुम्हीच मला नकळत शिकवल आहे! माझे आई-बाबा स्व-कष्टाने शिकत-शिकत आपल्या पायावर उभे होते. आम्ही तो संघर्ष पाहिला होता, एकला होता. पण आमच भविष्य त्यांचा संस्कराने वेगळ घडत होत. अणि अशाच मध्यम-वर्गीय समाजातून वर आलेली मूल/मुली ह्या समाजासाठी काहीतरी करायला पुढे येताना मी पाहत होतो. हा माझा संघर्ष ५ वर्षे चालला – पण मीही मागे हटलो नहीं. आई-वडिलांचा सम्मान काही संघर्शाने कधी प्रेमाने करत मी तग धरला.

ह्या सगल्या कोलाहलात माझेकाही इंजीनियरिंग चे मित्र माझ्यासोबत होते. मनोज पाटकर, मंगेश बांगर, नटराजन, धनञ्जय माली, मनोज पटनी आम्ही मुंबईत भेटत असू. फोनेवर्ती तासन-तास गप्पा मारत असू. कधी ते माझ्याकडे येत. आम्ही बर्याच मुद्द्यावर्ती रात्र जागवून गप्पा मारत (ज्या त्या आम्ही आजही भेटून मारतो) त्यांनी मला थोपवून धरलं. माझे प्रेरणास्त्रोत म्हणजे माझे इयत्ता 7 विचे गणिताचे शिक्षक श्री. एस. एस. ठाकुर सर. त्यांनी 7 वी च्या स्कालरशिप ला आम्हा मुलांना निशुल्क शिकवल. अणि तेव्हापासून ते आजपर्यंत ते माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत असतात. मी प्रकृतीने कृष असलेला केमिकल चा वास घेउन अजुन कमजोर तर होणार नाहीं ह्या कालजीने ते साक्षात एडमिशन अगोदर माझ्या केमिकल इंजीनियरिंग च्या कॉलेज ला जावुन आले होते. ते कित्येकदा माझा काम बघायला मध्य प्रदेश ला आले होते. ते निवृत्तीनंतर आजही गरीब-गरजू मुलांना मार्गदर्शन करतात. त्यांचा चेहर्यावरच  समाधान आणि आनंद बघताना नेहमी वाटायच अपन एव्हढे समाधानी कधी होवू का? सुदैवाने वर्णिका मला प्रदान मधेच भेटली आणि 2013 आम्ही लग्न केलं. दोघांचा ही घराच्याना कालजी असताना की ह्या पोरांचा कसं होणार – आम्ही जेव्हा सम्मति घ्यायला दोघा परिवारान्ना भेटलो तेव्हा ते एका पायावर तयार झाले! आज आम्ही दोघेही सोबत काम करतो. तुमचा पार्टनर तुमच्याच क्षेत्रात असला की घर अणि काम ह्यातल अंतर पार मिटल्यागत होतपण आमच्या कामात कुणीतरी तुम्हाला समजणार असण ह्यासारख दुसरं बळ नहीं. ह्या सर्वात कुणी माझ्या सोबत निर्धाराने उभी होती ती माझी बहिण, वीणा जामकर! ती नसती तर मी इतक्य ठामपणे ह्या क्षेत्रात उभा नसतो. ती प्रत्येक वर्षी माझ्याकडे यायची. माझ्यासोबत गावत जायची.. रहायची.. माझ कौतुक करायची.. तु बरोबर आहेस..छान काम आहे तुझ..असा म्हनायाची.. मधून-मधून पत्र लिहायची..छान-छान पुस्तक-फिल्म्स पाठवायची.. ती नेहमीच आई-वडिलांना समजावत आली. एक मुलगा म्हणून माझ्या ज्या जबाबदार्या पार पडायला लागत त्या ती माझ्या अपरोक्ष पार पाडत आली. मी माझे चढ़-उतार नेहमी तिच्याजवळ बोलत आलोय. ती एक उत्तम अभिनेत्री आहे हे सर्वासमक्ष आहे पण ती एक सवेदनशील व्यक्ति म्हणून शांतपणे विविध सामाजिक चलवलिंचा अभ्यास करत असते, चिक्कार वाचत असते.. जमेल ते करत असते  – त्यापद्दल मला तिचा नेहमीच अभिमान , आदर आणि कौतुक वाटत आलाय. ह्या सगल्या व्यक्ति आणि प्रसंगापद्दल सांगायच उद्देश्य की हे सगल आपल्या सगळ्यांचा आयुष्यात घडत असतात पण कदाचित हे डॉट्स आपण कनेक्ट करत नहीं आणि आपला षड्ज हुकतो..

मी सुरुवातीची 7 वर्ष मध्य प्रदेशाच्या बेतुल जिल्ह्याच्या पाढर ग्रामपंचायती मधे राहून तिथल्या आजुबाजुच्या गावत कामं केली. त्यानंतर 2012 ला मी छत्तीसगढ़ राज्यातील उत्तर बस्तर कांकेर जिल्ह्यातल्या भानुप्रतापपुर तहसील मधे नविन टीम सुरु केली. गावातल्या महिलांचे बचत गट स्थापन करुन त्यांना त्यांच्या मुद्द्यावर्ती संगठित करणं ही आमच्या कामाची पहिली पायरी असते. गेल्या तीन वर्षात 2500 गोंड समाजातील आदिवासी महिला, महिला शक्ति संगठन, भानुप्रतापपुर मधे संगठित झाल्या आहेत. हे बचत गट प्रत्येक आठवडा एकदा बैठक करुन आपल्याला जमेल तशी बचत करतात. बंकेशी जोडून कमी व्याजत कर्ज घेतात आणि आपल्या गरजसथी त्यांचा उपयोग करतात. पाहिले वार्षिक 120 टक्के व्यजवारून त्यांना 3 टक्के व्याजात त्यांना कर्ज मिळत! आता त्यांना गरजेला पैसे मागायला कुठल्या सावाकाराकडे जाव लगत नाही. इथला मुख्य धंदा शेती असला तरी, शेतीपासून मिलनार उत्पन्न त्यांना 6 ते 9 महिनेच पुरत. शेतितुन मिलनार उत्पादकता राष्ट्रीय उत्पन्नाच्या निम्म्यहुनाही कमी आहे. बाकीच्या उदार निर्वाहासाठी त्यांना वनौपाज अणि मजदूरी अवलंबून रहावा लगता. म्हणून शेतीचा उत्पन्न  वाढवन्यासाठी त्यांना आम्ही मदत करत आहोत. तसेच येथील शेती केवल पावसा-आधारित असल्यामुळे, पावसाला संपल्यावर महात्मा गाँधी ग्रामीण रोजगार गारंटी योजना (MGNREGA) वर्ती लोक अवलंबून असतात. आम्ही त्यांना MGNREGA मधे कधीही 100 दिवसाच काम मागता येत, ही माहिती दिल्यावर 4000 मजदुरान्नी एक दिवशी काम मागितला. अणि ते एका महिन्यात उपलब्ध ना केल्यामुले नियमाप्रमाने बेरोजगारी भत्त्याची मागणी केली. हा 45 लाखाहून अधिक भत्ता मिलान्यसाठी चा संघर्ष महिला शक्ति संगठन चा चालू आहे. अशातर्हेने 1983 पासून प्रदान बिहार, झारखण्ड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, ओडिशा, पश्चिम बंगाल ह्या सात राज्यातल्या 35 जिल्याताल्या 60 तहसील मधे काम करत आहे. प्रदान मधे आज 400 पेक्षा जास्त लोक कार्यरत आहेत ज्यापैकी 25 % महिला आहेत.

आपल्याला कित्येकदा वाटत की सामाजिक क्षेत्रात पैशाची कमी आहे. पण मला वाटत की सर्वात जास्त कमी ही प्रेरित युवक/युवतिंची आहे जे छोट्या कसब्यात (grassroot) राहून वंचित लोकांच्या सोबत मिळून काहीतरी बदल करायला धजावतिल त्यांची आहे. प्रदान भारतातल्या टॉप यूनिवर्सिटी मधे कैंपस रिक्रूटमेंट साठी जून दरवर्षी 60-80 जण युवा/युवती प्रदान मधे अपरेंटिस म्हणून ज्वाइन करतात. हे बरेचसे इंजीनियरिंग, मैनेजमेंट, एग्रीकल्चर, सोशल साइंस, सोशल वर्क डिग्री होल्डर्स असतात. ह्यातील बरेचसे यायच्या अगोदर एक कुतूहल म्हणून येतात आणि प्रदान ची काम करण्याची पद्धत आणि लोकांचा आयुष्यात होत असलेला बदल पाहून थाम्बतात. आज मी जेव्हा मागे वलून बघतो तेव्हा मला नेहमीच भावत की आपण जेव्हा दुसर्या लोकासोबत प्रामाणिक पणे काम करत असतो  तेव्हा आपल्या स्वताहत ही बरेच आमूलाग्र बदल होत असतात. आपण अजुन चांगले मानुस बनत असतो. मला नेहमीच वाटत की मी प्रदान मधे आल्या पासून कधीच ‘नोकरी’ केली नाहीये. मला जे हव तेच मी करत आलोय. आपला सर्वार्थाने कस लागल्याचा जो काही आनंद आहे तो अवर्णनीय आहे. आम्ही महिला बचत गतासोबत काम करतो. जेंडर (लिंगभेद) हा प्रदान च्या कामाचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही गावातील महिलासोबत काम करन्याअगोदर आमच्या जेंडर ट्रेनिंग झाल्या. पितृसत्ताक संस्क्रुतिमुले केवल महिलाच नाही तर पुरुष ही कसे पीड़ित असतात हे मला हलूहलू कळत होत. महिलावर अत्यचार हे गावापेक्षा शहरात जास्त होतात हे रिसर्च म्हणत होत – आणि त्यातला माझा वाटा मला दिसत होता. माझ्या ‘उच्चशिक्षणानी’ मला तन्त्रद्न्य बनवला होता पण चांगला माणुस बनायची जबाबदारी माझ्यावरच सोपवली होती. ही मदत प्रदान च्या कामामुले मला झाली. चांगला ‘पुरुष’ बनायची सुरुवात ह्या अनुभवातून झाली आहे. फील्ड गाइड हा आमच्या कामातला महत्वाचा भाग. फील्ड गाइड हा नविन आलेल्या अपरेंटिस ला गाइड करतो. आम्हाला त्यासाठी मानसोपचारतद्न्यानी गाइडिंग चे धड़े दिले. फादर फुस्टर यांचे attending-responding-personalising-initialising मॉडल हे कसे केवल गाइडिंग साठीच नाही तर प्रत्येक नात्यात कसे महत्त्वाचे आहे हे कलल. Interpersonal and Group Effectiveness चा ट्रेनिंग प्रोग्राममधे जेव्हा स्वतः सहभागी झालो अणि नंतर मी जेव्हा स्वतः ट्रेनिंग द्यायला लागलो तेव्हा ग्रुप मधे कस योग्यरितिने काम करायचे याचे धड़े मिळाले. असे बरेच ट्रेनिंग प्रोग्राम प्रदान मधे नित्य-नियमाने होत असतात. वेगळ्या विचाराने भारावलेले, जग बदलायला निघालेले आदर्शवादी पण तितकेच कल्पक अणि प्रैक्टिकल माझे सहभागी आहेत. ते नेहमीच मला उर्जा देत असतात. आमचा प्रदान मधील सहकार्यांचा एक इनफॉर्मल ग्रुप आहे. आम्ही दर तीन महिन्यान्नी दोन दिवसासाठी भेटतो. कामाताले कटु-गोड अनुभव वाटतो. हा ग्रुप आमचा सपोर्ट ग्रुप आहे. कुणी disturbed असेल तर त्याच्यासोबत असतो. कुणी फार छान काम केल असेल तर त्यापासून शिकतो. कधितरी आम्ही छोटासा फिल्म फेस्टिवल आयोजित करतो आणि छान फिल्म्स अणि documentaries पाहतो. कधीतरी ज्वलंत मुद्द्यावर्ती सव्वाद आयोजित करतो. पहुन्याना बोलावतो. आपले मुद्दे ठेवतो. कधीतरी बाइक ड्राइव वर्ती तर कधी जंगलात पिकनिक साठी जातो. अशा निसर्गरम्य ठिकाणी राहिल्यावर मुंबई/दिल्लीत आल्यावर कधी एकदा परत जातो असा वाटत. मला हेच कळत नहीं की आम्ही ‘काम’ केव्हा करतो? आणि सर्वात महत्त्वाचा जेव्हा कधी कामात असफलता किव्वा कटु अनिभव येतात तेव्हा फक्त आणि फक्त एकाच गोष्ट तग धरवाते अणि ती म्हणजे  गावातल्या लोकांच निस्सीम प्रेम आणि एक्मेकविशायी असलेला आदर. झुनकी बाई सारखे शेकडो माणस तुमच्यावर्ती जीवापाड प्रेम करतात, तुम्हला त्यांचा कुटुम्बाचा अक्षरशः एक सदस्य मानतात – ह्या सारखा सम्मान अजुन कुठलाच नाही. मला नहीं वाटत मी कही सोशल वर्क करतो. मी ह्या ‘गरीब’ लोकसथी काय करतो? ‘गरीब’ असण्याची व्याख्या काय? – आपल्यापेक्षा पैसे कमी असणारे हे गरीब की त्यांचापेक्षा माणुसकी अणि दुर्दम्य इच्छाशक्ति कमी असणारे आपण गरीब? मला अस वाटत की उगाच मी माझ्या निरर्थक आयुष्याला ह्या लोकामुले अर्थ द्यायची एक धडपड करत असतो. आणि ह्या धडपडीत आम्ही दोघाही एकमेकाला घडवत असतो.. हसवत असतो.. ह्यांनी जग किती बदलेलं माहित नाही पण आम्ही बदलत असतो.. आमच्या चांगल्या असण्याला मर्यादा आहेत इतर चार-चौघसराख्या पण आपले दोष स्वीकारण्याची खिलाडूवृत्ति (Sportsmanship) हलुहलू वाढत जाते.. आणि अस हे हात धरून एक्मेकासोबत असणच खुप्प महत्त्वाच आहे..तेव्हढच आपल्या हातात आहे.. बाकि सगळ मिथ्या आहे.     

प्रदान ला आणि तत्सम सामाजिक संस्थांना आज अशा लाखो युवांची गरज आहे. आम्हाला छानसा पगार मिलतो. फक्त खादिचे कपडे घालून, आजन्म ब्रह्मचर्य पालुन अविरत सेवा करणारे आम्ही नाहीत. आम्ही इतराप्रमाने नार्मल आयुष्य जगतो. फक्त फरक इतकाच की आपल्या अक्कल-हुशारिचा उपयोग कुठल्या अडानी-अम्बानी साठी करण्यापेक्षा ज्यांना त्याची खरच गरज आहे अणि मुख्यतः ज्यांना त्याची खरी किम्मत आहे त्यांचासाठी करतो. ह्या कामाचे अशे कही सेट फोर्मुले नहीं आहेत. प्रत्येक दिवस हा एक नवी चुनौती घेउन उभा असतो अणि त्याला तुम्हाला कल्पकतेने तोंड द्यायच असतं. आपला पुरेपुर कस लागल्याचा अनुभव अनुभव अजुन कुठे मिलने दुर्लभ! कुणीही तत्सम मार्केट च्या हिशोबानी जरी बघितल तरी आज कित्येक अंतर-राष्ट्रीय संस्था विकसनशील देशन्ना आर्थिक मदत द्यायला तयार आहेत. पण ह्या क्षेत्रात जमिनिगत कामाची समज असून प्रोफेशनल ‘समाजसेवा’ करू शकतील अशा लोकांची खुप्प कमी आहे. त्यांना गले-लठ्ठ पगाराची नोकरी ही मिलु शकते. डेवलपमेंट स्टडीज/सोशल वर्क चे बरेचसे अभ्यासक्रम वेग-वेगळ्या राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय संस्था चालू करत आहेत. थोडक्यात मानसिक समाधान अणि आर्थिक सक्षमता ह्यांच सुयोग्य मिश्रण ह्या क्षेत्रात आहे! ह्या क्षेत्रात यायला तुम्हाला घरावर तुलशी-पत्र ठेवूनच यायला हवा ही भ्रामक संकल्पना आज झाली आहे.. ती अजुन दूर झालेली नाही..ह्या क्षेत्रापददल IT, इंजीनियरिंग, मेडिकल, बैंकिंग ह्या क्षेत्राइतकी माहिती नाही म्हणून मनात असुनही बरेचसे युवक ह्या क्षेत्रात येत नाहित.. किम्बहुना हीच भीती मलाही १० वर्षापूर्वी वाटत होती. पण आज हा लेख लिहायचा उद्देश्य हाच की तुम्हाला 1 % जरी वाटत असेल की आपल्या शिक्षणाचा, अक्कल-हुशारिचा उपयोग हा आपल कुटुंब सोडून बाकी वंचित लोकासाठी व्हायला हवा तर तुम्ही खुशाल झोकुन दया...    

आमच् काम हे फक्त गावापुरता मर्यादित नाहीये. आम्ही जे करतोय ते वास्तविक शासनाने करायला हव. पण विकास हा फार क्लिष्ट मुद्दा आहे तो केवल शासन व्यवस्था पुरी पडू शकत नाही. त्यामुले आमचे प्रयत्न कही गावात छोटे कल्पक प्रकल्प उभे करुन, शासनाला त्याची नोंद घ्यायला लावून ते पूर्ण देशभर करायला लावण आहे. हा नेहमीच काही इतका सरल अणि सुखद अनुभव नसतो, पण सिस्टम मधे काम करताना त्याच्या खच-खलग्यतुन रास्ता काढत काम करवन ह्यालाही कल्पकता लागते. आमचा भर ह्या महिलांचा संघटना बनावुन, त्यांना सशक्त बनवुन.. तिथून निघून जाण आहे. विकासाला पूरक अशा बाकि रिसर्च संस्था, मीडिया, राजकीय नेते, पैशाची व्यवस्था करणार्य संस्था (फंडिंग एजेंसीज), शासनव्यवस्था इ. विविध संस्थासोबत काम करुन ग्रामीण भारतीयांचा आयुष्यात सकारात्मक बदल आनन हा प्रदान चा एप्रोच आहे. गेल्या वर्षीच केवल आजीविका वर लक्ष केन्द्रित ना करता ‘न्याय अणि समतेवर आधारित नव्या समाजाची संरचना’ करण्याचा नविन मिशन प्रदान ने मागच्या वर्षी अंगिकारल आहे – जे फार आव्हानात्मक आहे. पण ते समाजातल्या विविध मुद्द्यावर्ती काम करायला आम्हाला आव्हाहन देट आहे.

आपण कितीही उच्चशिक्षित झालो तरी नागरिक म्हणून केवल मतदान करन्या इतकही आपलं कर्तव्य आपण पाळत नाही, दुसर्याच्या भ्रष्टाचारावर्ती टिका करणारे आपण स्वतः मात्र तलात्यापासून ते अधिकार्यापसुन पर्यंत सगाल्याना पैसे चारत असतो, आजही उच्चशिक्षित मुलांचा तित्क्याचा शिकलेल्या मुलीकडून आपल्या आई सारखच - स्वतः नोकरीशिवाय काहीही ना करता - घरकाम, मूल-बाळ साम्भालुन नोकरी करण्याची अपेक्षा असते. दिवसे दिवस श्रीमंत अजुन श्रीमंत होत आहेत आणि गरीब अजुन गरीब होत आहेत – श्रीमंत अणि गरीब लोकामधील दरी वाढत आहे, आपण आज ज्या पद्धतीने ऐहिक उपभोग घेत आहोत, त्याच वेगाने गेल्यास 2050 पर्यंत आपल्याला 3 पृथ्वी लागतील अस शास्त्रन्द्य्य म्हणत आहेत, महिला अणि मुलावर होणारे अत्याचार कमी होत नहीं आहेत, आजही व्यवस्थित पांघरून अणि छत नासल्यामुले हजारो बेघर थंडीत मरतात, मुलींची भ्रुन्हात्य अणि प्रेमिकांची कत्तल आजही खाप पंचायत करत आहेत, ग्लोबल वार्मिंग मुले हवामानचा भरोसा तुटत चाललाय – कधी उत्तराखंड ला आला तस घातक पुर येतो तर कधी कोरड पडून शेतकरी आत्महत्या करतात, आजही HIV ग्रसित मूल समाजातून वालित टाकली जातात, मानसिक आजार वाढत आहेत – अशा आजचा काळात जेव्हा अमेरिकेत आणि चीन मधल्या वैश्विक  मंदिमुले भारतात ही फरक पडतो कारण अपन सगले एकमेकावर अवलंबून झालो आहोत. आपण केवल आपल्यापुरतं विचार करण, जगण हे वैद्न्यानिक दृष्टा अशक्य आहे. ह्या समजासमोर आ वासून उभ्या असलेल्या अनेक मुद्द्यापैकी कुठलाही एक मुद्दा घेउन त्यावर हसत-हसत आपल्याला पणाला लावणारे युवा आपल्याला हवे आहेत... बोला आहात तयार तुम्ही?


journey from i to my natural self, me..

Followers